शेती
दिवाळीपूर्वी भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करा; केंद्रीय पथकाच्या बीडमधील आढाव्यात सूचना
जिल्ह्यात ७.४२ लाख हेक्टरवरील पिके बाधित; सोयाबीनचे उत्पादन हेक्टरी १,५३४ किलोवरून ४१० किलोवर, धरणांत १४.६१ टक्के साठा
माय महा राष्ट्र वृत्तसेवा, बीड
प्रकाशित:

बीड : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती पीक नुकसानीची भरपाई दिवाळीआधी पडावी म्हणून पीक कापणीचे प्रयोग वेळेत संपवून नुकसान अचूकपणे नोंदवा आणि सोयाबीनचे रखडलेले प्रयोग सणापूर्वी पूर्ण करा, अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी केल्या. अग्रवाल हे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागात संयुक्त सचिव आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी (ता. १०) जिल्ह्यातील १५ ठिकाणी पाहणी केल्यानंतर पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सादर केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात खरिपाची ७ लाख ८७ हजार २१८ हेक्टरवर पेरणी झाली होती, त्यातील ७,४२,१६३ हेक्टरवरच्या पिकांना फटका बसला आहे. १,३५३ गावांतील सुमारे ८ लाख २२ हजार शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान ३५६ मिमी, म्हणजे सरासरीच्या ६२.८९ टक्के पाऊस झाला; ऑगस्टमध्ये तर तो सरासरीच्या केवळ १८.४ टक्के होता.
पीक कापणी प्रयोगांच्या प्राथमिक आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत हेक्टरी सरासरी १,५३४ किलो असलेले सोयाबीनचे उत्पादन यंदा ४१० किलोवर आले आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत ३,१३२ प्रयोगांपैकी ९५७ प्रयोग पूर्ण झाले होते; सोयाबीनच्या ५७६ पैकी ३१० प्रयोग झाले असून कापूस आणि तुरीचे प्रयोग बाकी आहेत. जिल्ह्यातील १६४ प्रकल्पांत केवळ १४.६१ टक्के उपयुक्त साठा असून सप्टेंबरमधील नोंदीनुसार भूजल पातळी सरासरी ४.५५ मीटरने खालावली आहे.
दुष्काळाची तीव्रता ठरवताना प्रत्यक्ष स्थिती, पर्जन्यमान आणि तांत्रिक निर्देशांकांची पडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा; पिण्याचे पाणी, चारा आणि रोजगाराचे नियोजन करावे, असेही अग्रवाल यांनी सांगितले. पाहणीदरम्यान बीड तालुक्यातील मोरगाव येथे एकरी सात-आठ क्विंटलऐवजी जेमतेम ५० किलो सोयाबीन निघण्याची शक्यता असल्याचे, तर पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही आणि सोनेगाव परिसरात ६५ दिवसांपासून पाऊस नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा
संबंधित बातम्या
- १०० वनराई बंधारे, ६ दिवस आणि शून्य खर्चात! नाशिकच्या शेतकऱ्यांची दुष्काळाशी लढण्यासाठी अभूतपूर्व एकजूट
- वडेगाव-भजेपारच्या शेतकऱ्यांना आरसीबी कालव्यातून पाणी द्या; आमदार विजय रहांगडाले यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश
- रामेश्वरच्या संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू; उसाला प्रतिटन ३,१५१ ते ३,३५१ रुपये भाव
- सुलवाडे-जामफळ योजनेच्या मुख्य पाइपलाइन जोडणीला सुरुवात; शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांना मिळणार तापीचे पाणी
- नांदेडमध्ये रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल प्रमाणित बियाण्यांचे नियोजन; हरभऱ्यावर भर
- केज-मांजरसुंबा मार्गावर पिकअपला टिप्परची धडक; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, पाच जनावरेही दगावली
https://mymaharashtra.in/sheti/divalipurwi-bharpaisathi-pik-kapni-prayog-velet-purn-kara-kendriya-pathkachya-10235
