शेती
सुलवाडे-जामफळ योजनेच्या मुख्य पाइपलाइन जोडणीला सुरुवात; शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांना मिळणार तापीचे पाणी
२६,९०७ हेक्टरला सिंचनाचा लाभ; जून २०२७ पासून टप्प्याटप्प्याने पाणी देण्याचा प्रयत्न, पालकमंत्री रावल यांची माहिती
माय महा राष्ट्र वृत्तसेवा, धुळे
प्रकाशित:

धुळे : सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेतील जामफळ धरणाच्या बंदिस्त पाइपलाइन वितरण प्रणालीच्या (पीडीएन) मुख्य जोडणीचे काम रविवारी (११ ऑक्टोबर) सुरू झाले. वर्षानुवर्षे दुष्काळाशी झुंजणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांतील २६,९०७ हेक्टर शेतीला या योजनेतून शाश्वत सिंचनाचा लाभ मिळणार असून जून २०२७ पासून टप्प्याटप्प्याने पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
बारमाही वाहणारी तापी जवळ असूनही शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांची शेती पावसावरच अवलंबून राहिली; ती स्थिती बदलण्यासाठी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला, असे रावल म्हणाले. पीडीएन प्रणालीसाठी १,०५८ कोटी रुपयांची कामे सुरू असून एकूण सुमारे ७६६ किलोमीटर पाइपलाइनपैकी ५४९ किलोमीटर पाइपचा पुरवठा झाला आहे आणि ३२५ किलोमीटर पाइपलाइन टाकून झाली आहे. प्रकल्पाची एकूण प्रगती ४२.४१ टक्के आहे.
पाच रेल्वेमार्ग आणि तीन राष्ट्रीय महामार्ग ओलांडावे लागणार असून त्यापैकी दाबली, मेलाणे आणि माळीच येथील रेल्वे क्रॉसिंगची कामे झाली आहेत, तर होळचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. मुख्य सुलवाडे-जामफळ प्रकल्पाचे जवळपास ८० टक्के काम झाले आहे; संपूर्ण प्रकल्पाची वाट न पाहता शेतकऱ्यांना लवकर पाणी मिळावे म्हणून मुख्य पाइपलाइन जोडणी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेतून सुमारे एक टीएमसी (२८.३२ दशलक्ष घनमीटर) पाणी उपलब्ध होईल. सुरुवातीला सुमारे सहा हजार हेक्टरला आणि नंतर १३ ते १४ हजार हेक्टरला पाणी देण्याचे नियोजन आहे. लाभक्षेत्र सहा विभागांत विभागले असून पाणी व्यवस्थापनासाठी ८९ पाणीवापर संस्था स्थापन केल्या जात आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे कार्यक्रमाला उपस्थित होते.
माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा
संबंधित बातम्या
- १०० वनराई बंधारे, ६ दिवस आणि शून्य खर्चात! नाशिकच्या शेतकऱ्यांची दुष्काळाशी लढण्यासाठी अभूतपूर्व एकजूट
- वडेगाव-भजेपारच्या शेतकऱ्यांना आरसीबी कालव्यातून पाणी द्या; आमदार विजय रहांगडाले यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश
- रामेश्वरच्या संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू; उसाला प्रतिटन ३,१५१ ते ३,३५१ रुपये भाव
- नांदेडमध्ये रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल प्रमाणित बियाण्यांचे नियोजन; हरभऱ्यावर भर
- मेडशी मंडळात सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात; एकरी अवघे एक ते दोन क्विंटल उत्पादन
- मानसिक समस्या असणाऱ्यांना समजून घ्या; धुळ्यात जनजागृती फेरीत जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन
https://mymaharashtra.in/sheti/sulvade-jamfal-yojnechya-mukhya-paiplain-jodnila-suruvat-shindkheda-talukyatil-10336
