शेती
१०० वनराई बंधारे, ६ दिवस आणि शून्य खर्चात! नाशिकच्या शेतकऱ्यांची दुष्काळाशी लढण्यासाठी अभूतपूर्व एकजूट
प्रकाशित:
यंदा पावसाने ओढ दिली, तर उभ्या पिकांना पाणी कुठून द्यायचं? आणि पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी उन्हाळ्यात उपयोगी कसं आणायचं? यंदा एल-निनोच्या या परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक गावाने एक मोठं पाऊल उचललं. अवघ्या ६ दिवसांत १०० वनराई बंधारे उभारण्यात आले. विशेष म्हणजे, हे काम झालं उपलब्ध साहित्य आणि श्रमदानाच्या बळावर, अगदी शून्य खर्चात!
आणि या संपूर्ण उपक्रमाचा पुढाकार घेतला होता, पानी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप’ स्पर्धेसाठी ‘संजीवनी शेतकरी गटा’तील १३ शेतकऱ्यांनी. हे शेतकऱ्यांना शेतीत नवे प्रयोग करत असतानाच पावसाच्या अनिश्चिततेमुळे गावासाठीही काहीतरी करण्याची गरज जाणवली. सप्टेंबरमध्ये झालेल्या पानी फाउंडेशनच्या ‘नेतृत्व संवाद’ कार्यक्रमातून प्रेरणा घेत १०० बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट ठरवलं.
गटाचे मेंटर सहाय्यक कृषी अधिकारी शिवचरण कोकाटे सांगतात, “डोंगरदऱ्यांतून वेगाने वाहून जाणारं पाणी अडवून जमिनीत मुरवता यावं आणि गरजेच्या वेळी शेतीसाठी उपलब्ध व्हावं, हा यामागचा विचार होता. जिथे माती-रेती उपलब्ध होती, तिथे गोण्यांचे, तर जिथे हे साहित्य नव्हतं, तिथे उपलब्ध दगडांचे बांध घालण्याचं नियोजन केलं.”
मग सुरू झालं प्रत्यक्ष काम! बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांहून विनामूल्य गोण्या गोळा केल्या. गटातील शेतकऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांनी आणि गावातील इतर शेतकऱ्यांनीही मदतीचा हात दिला. अशा प्रकारे जवळपास ५० जण एकत्र आले आणि टप्प्याटप्प्याने १०० बंधारे पूर्ण झाले.
या कामाचा फायदा पहिल्याच बंधाऱ्यापासून दिसू लागला. गटातील शेतकरी कोंडाजी गिळंदे दादा सांगतात, “पहिला बंधारा बांधला, तेव्हा शेजारील शेतात भेंडी वाळत चालली होती. आधी तिथे पाणी अडत नव्हतं; पण बंधारा बांधल्यावर शेतकऱ्याने त्याच दिवशी इंजिन आणून पाणी दिलं. त्यामुळे भेंडीचं पीक वाचण्यास मदत झाली.”
आता या बंधाऱ्यांमुळे नाल्यांतील पाणी अधिक काळ उपलब्ध राहण्यास, परिसरातील जमिनीत ओलावा टिकण्यास आणि उन्हाळ्यात जनावरांसाठी पाण्याची सोय होण्यास मदत होणार आहे. आगामी रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी यांसारखी पिकं घेण्यासाठीही या पाण्याचा उपयोग होऊ शकतो.
शेतकऱ्यांनी १०० वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी सामूहिक प्रयत्नांची ताकद प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली आहे!
माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा
संबंधित बातम्या
- वडेगाव-भजेपारच्या शेतकऱ्यांना आरसीबी कालव्यातून पाणी द्या; आमदार विजय रहांगडाले यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश
- रामेश्वरच्या संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू; उसाला प्रतिटन ३,१५१ ते ३,३५१ रुपये भाव
- सुलवाडे-जामफळ योजनेच्या मुख्य पाइपलाइन जोडणीला सुरुवात; शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांना मिळणार तापीचे पाणी
- नांदेडमध्ये रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल प्रमाणित बियाण्यांचे नियोजन; हरभऱ्यावर भर
- मेडशी मंडळात सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात; एकरी अवघे एक ते दोन क्विंटल उत्पादन
- नांदेड जिल्हा कारागृहातील ४२ कच्च्या कैद्यांना शेतकरी ओळखपत्र; कुटुंबांना योजनांचा लाभ मिळत राहणार
https://mymaharashtra.in/sheti/100-vanrai-bandhare-6-divas-ani-shunya-kharchat-nashikachya-shetkaryanchi-10357
