मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

शेती

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर तालुक्यांत दुष्काळाची प्रत्यक्ष पडताळणी होणार

राज्यातील आणखी १८ तालुक्यांत ‘ग्राऊंड ट्रुथिंग’; प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, भंडारा

प्रकाशित:

भाताचे शेत
प्रतीकात्मक छायाचित्र: Shagil Kannur / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

भंडारा : दुष्काळाच्या तीव्रतेचे अधिक अचूक मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाने आणखी १८ तालुक्यांत प्रत्यक्ष पडताळणीला (ग्राऊंड ट्रुथिंग) मान्यता दिली असून त्यात भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर तालुक्यांचा समावेश आहे. मदत व पुनर्वसन विभागाने ९ ऑक्टोबरला याबाबतचा शासन निर्णय काढला.

या तालुक्यांत प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण होणार असून उपग्रह छायाचित्रे, नकाशे आणि संगणकीय माहितीवरून आलेल्या निष्कर्षांची शेतात प्रत्यक्ष भेट देऊन खातरजमा केली जाईल. दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधील तरतुदींनुसार ही पडताळणी होणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या २९ सप्टेंबरच्या बैठकीतील निर्देशांनुसार जून ते सप्टेंबरमधील पावसाची तूट आणि इतर घटकांचा विचार करून ही यादी ठरवण्यात आली.

राज्यात २५ सप्टेंबरच्या शासन निर्णयाने २६५ तालुक्यांत ट्रिगर-१ च्या निकषांवर दुष्काळ घोषित झाला असून तेथे १२ उपाययोजना व सवलती लागू आहेत. पडताळणीच्या नव्या यादीत विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील तालुक्यांचाही समावेश आहे.

माहिती स्रोत: महासंवाद

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा