शेती
केंद्रीय पथकाकडून अमरावती विभागातील दुष्काळाचा आढावा; वाशीम जिल्ह्यात शेतांच्या बांधावर पाहणी
पाचही जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण; पीक नुकसान, पाणीटंचाई, चारा आणि मजुरांच्या स्थलांतराकडे वेधले लक्ष
माय महा राष्ट्र वृत्तसेवा, वाशिम
प्रकाशित:

वाशीम : केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने शुक्रवारी (ता. ९) वाशीम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती आणि पीक नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर पथकाने वाशीम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अभय भारत, संजय मीना, सीमा राणी, महेश कुमार आणि अर्जेश कुमार मधोक या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पथकात समावेश आहे. राज्यातील दुष्काळाची पाहणी करणाऱ्या केंद्राच्या ११ सदस्यीय पथकात नीती आयोग, अर्थ, पशुसंवर्धन, अन्न-नागरी पुरवठा, पाणीपुरवठा, ग्रामीण विकास, जलसंपदा आणि कृषी विभागांचे अधिकारी आहेत.
बैठकीला वाशीमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, अमरावतीचे आशिष येरेकर, यवतमाळचे विकास मीना, बुलढाण्याचे प्रवीणकुमार देवरे आणि अकोल्याच्या वर्षा मीना उपस्थित होते. पाचही जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील स्थितीचे सादरीकरण केले. पावसाच्या तुटीमुळे झालेले पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि टँकरची संभाव्य गरज, शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न आणि मजुरांच्या स्थलांतराची शक्यता याकडे त्यांनी पथकाचे लक्ष वेधले. जनावरांच्या चाऱ्याची सद्यस्थिती आणि पुढील सात महिन्यांतील संभाव्य परिस्थितीचीही माहिती पथकाने घेतली.
बैठकीनंतर पथकाने वाशीम तालुक्यातील सुपखेला येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. मंगरूळपीर तालुक्यातील स्वासिन येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाला भेट देऊन परिसरातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. कोठारी, मानोरा तालुक्यातील कुपटा आणि कारंजा तालुक्यातील काळीकारंजा व पानविहीर येथेही पथकाने शेतांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यातील निरीक्षणांच्या आधारे दुष्काळाची स्थिती आणि आवश्यक उपाययोजनांबाबतचा अहवाल केंद्राला दिला जाईल.
माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा
संबंधित बातम्या
- १०० वनराई बंधारे, ६ दिवस आणि शून्य खर्चात! नाशिकच्या शेतकऱ्यांची दुष्काळाशी लढण्यासाठी अभूतपूर्व एकजूट
- वडेगाव-भजेपारच्या शेतकऱ्यांना आरसीबी कालव्यातून पाणी द्या; आमदार विजय रहांगडाले यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश
- रामेश्वरच्या संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू; उसाला प्रतिटन ३,१५१ ते ३,३५१ रुपये भाव
- सुलवाडे-जामफळ योजनेच्या मुख्य पाइपलाइन जोडणीला सुरुवात; शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांना मिळणार तापीचे पाणी
- नांदेडमध्ये रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल प्रमाणित बियाण्यांचे नियोजन; हरभऱ्यावर भर
- कारंजाच्या श्री कामाक्षा देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
https://mymaharashtra.in/sheti/kendriya-pathkakdun-amravati-vibhagatil-dushkalacha-adhava-vashim-jilhyat-10064
