मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

शेती

हमीभावाने कापूस खरेदीवर स्थानिक निगराणी समित्यांची नजर; वाशीम जिल्ह्यात चार केंद्रे

अनसिंग, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा येथील खरेदी केंद्रांसाठी कायमस्वरूपी समित्या; दरमहा आढावा

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, वाशिम

प्रकाशित:

फुललेली कापसाची बोंडे
प्रतीकात्मक छायाचित्र: Nanditha Gogate, WELL Labs / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

वाशीम : भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) किमान आधारभूत किमतीने होणारी कापूस खरेदी पारदर्शक आणि प्रभावी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील चारही खरेदी केंद्रांवर कायमस्वरूपी स्थानिक निगराणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मान्यतेने हे आदेश जारी झाले. अनसिंग (ता. वाशीम), मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा येथे ही खरेदी केंद्रे आहेत.

संबंधित तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार समितीचे अध्यक्ष, तर सहायक निबंधक (सहकारी संस्था) सदस्य सचिव असतील. तालुका कृषी अधिकारी, सीसीआयच्या अकोला शाखेने नेमलेले केंद्रप्रमुख आणि संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव समितीचे सदस्य असतील. केंद्रांवरील खरेदी प्रक्रियेवर प्रत्यक्ष देखरेख ठेवणे, कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी व नोंदणीतील समस्या सोडवणे आणि तक्रारींचे निवारण करणे, ही समितीची जबाबदारी असेल.

‘कपास किसान’ ॲपवरील शेतकऱ्यांच्या नोंदणीतील अडचणी दूर करणे आणि या ॲपबाबत व्यापक जनजागृती करणे, हेही समितीचे काम असेल. शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन किंवा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे. समितीच्या दरमहा बैठका होतील आणि खरेदीचा आढावा घेऊन वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केला जाईल.

माहिती स्रोत: ॲग्रोवन

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा