मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

शेती

दुष्काळामुळे अमरावती जिल्ह्यात सोयाबीन, तुरीचे कुटार फक्त जनावरांसाठी; औद्योगिक वापरावर पूर्ण बंदी

ब्रिकेट्स-पेलेट्स उद्योगांना कुटार खरेदी, वापर आणि वाहतुकीस मनाई; उल्लंघन केल्यास परवाना रद्द, फौजदारी गुन्हे

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, अमरावती

प्रकाशित:

चाऱ्याची गंज
प्रतीकात्मक छायाचित्र: Shyamal L. / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी जिल्ह्यातील सोयाबीन आणि आगामी तूर पिकाचे कुटार, भुसा व वैरण केवळ जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा (१९५५) आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) यांतील तरतुदींनुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने हे आदेश काढले आहेत.

गट्टू, बायोमास ब्रिकेट्स आणि पेलेट्स बनवणाऱ्या उद्योगांना तसेच कारखान्यांतील बॉयलर युनिट्सना कुटार इंधन म्हणून वापरणे, खरेदी करणे आणि त्याची वाहतूक करणे यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडून साठा आढळल्यास तो जप्त करून संबंधित प्रकल्पाचा औद्योगिक परवाना रद्द केला जाईल. नफ्यासाठी कुटाराची साठेबाजी करता येणार नाही आणि स्थानिक शेतकरी, पशुपालक व मान्यताप्राप्त गोशाळांव्यतिरिक्त इतरांना ते विकता येणार नाही.

जिल्ह्याबाहेर कुटाराची अनधिकृत वाहतूक रोखण्यात आली आहे; दुष्काळग्रस्त भागातील पशुपालक किंवा नोंदणीकृत गोशाळांसाठी कुटार न्यायचे असेल, तर तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांची आधी परवानगी घ्यावी लागेल. अंमलबजावणीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली असून त्यात पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस निरीक्षक, कृषी अधिकारी आणि उद्योग निरीक्षकांचा समावेश आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि जप्त साहित्य व वाहने शासकीय गोदाम किंवा गोशाळेत जमा केली जातील.

माहिती स्रोत: हिंदुस्थान समाचार

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा