मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

शेती

अलिबागमध्ये सरासरीहून अधिक पाऊस, तरीही भात उत्पादनात ३० ते ४० टक्के घटीचा अंदाज

पावसाच्या असमान वितरणाने पिकांवर ताण; १८-१९ दिवसांच्या खंडाने शेतांना भेगा, कीड-रोगांचा प्रादुर्भाव

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, रायगड

प्रकाशित:

डोंगराळ भागातील हिरवीगार भातशेती
प्रतीकात्मक छायाचित्र: महाराष्ट्रातील भातशेती छायाचित्र: Shagil Kannur / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

अलिबाग : अलिबाग तालुक्यात यंदा आतापर्यंत २,३६१.९ मिलिमीटर पाऊस झाला असून तो २,२१३ मिलिमीटरच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक आहे. मात्र पावसाचे वितरण असमान आणि अनियमित राहिल्याने खरीप पिकांवर पाण्याचा ताण आला आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवर बदललेले हवामान आणि गेल्या १८ ते १९ दिवसांचा खंड यामुळे भात उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

तालुक्यात यंदा ९,०२०.४० हेक्टरवर खरीप पिके घेण्यात आली. त्यात ८,९०६.११ हेक्टर भात, २५.५० हेक्टर नाचणी आणि बांधावरील ८८.१० हेक्टर तुरीचा समावेश आहे.

यंदा जूनअखेरपर्यंत पेरण्या सुरू होत्या. जुलैतील अतिवृष्टीत अनेक ठिकाणी रोपवाटिकांचे नुकसान झाले, तर आता सप्टेंबर-ऑक्टोबरमधील कडक ऊन आणि पावसाच्या खंडामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत आहे. अनेक शेतांना भेगा पडल्या असून पिके पिवळी पडू लागली आहेत.

सध्या हळवे भात दाणे भरण्याच्या आणि फुलोऱ्याच्या, निमगरवे पोटरीच्या, तर गरवे फुटव्याच्या अवस्थेत आहे. ओलावा घटल्याने दाणे भरण्यावर आणि वाढीवर परिणाम होत असून खोडकिडा, कडाकरपा अशा कीड-रोगांचे प्रमाणही वाढत आहे.

माहिती स्रोत: पुढारी

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा