मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

शेती

वांद्रीचे पाणी पिण्यासाठी राखीव; पालघरमधील भातउत्पादक चिंतेत

पावसाने ओढ दिल्याने दाणे भरण्याच्या टप्प्यातील पीक धोक्यात; आरक्षित साठा वगळून उरलेले पाणी देण्याची मागणी

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, पालघर

प्रकाशित:

डोंगररांगांच्या पायथ्याशी पिवळी पडू लागलेली भातशेती
प्रतीकात्मक छायाचित्र: महाराष्ट्रातील भातशेती छायाचित्र: Shagil Kannur / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

पालघर : खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पालघर तालुक्यातील भात उत्पादक अडचणीत आले आहेत. दाणे भरण्याच्या अवस्थेतील पीक पाण्याअभावी करपण्याची भीती असतानाच, धरणांतील साठा पिण्याच्या पाण्यासाठी नियोजित करण्याबाबत शासनाने परिपत्रक काढले. त्यामुळे वांद्री धरणातून सिंचनासाठी पाणी मिळेल, ही शेतकऱ्यांची आशा मावळू लागली आहे.

गांजे गावाच्या हद्दीतील वांद्री धरणाची साठवण क्षमता ३५ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचा ९ किलोमीटरचा डावा कालवा वेहलोली, खैरे, सातिवलीसह सहा गावांतील शेतीला, तर १२ किलोमीटरचा उजवा कालवा गांजे, ढेकाळे, वरईसह दहा गावांना पाणी देतो. धरणातील १३ एमएलडी पाणी आरक्षित असून, त्यातील ११ एमएलडी टोकराळे येथील रिलायन्सच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी आणि २ एमएलडी नंदाडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी आहे.

या दोन्ही योजनांच्या जलवाहिन्यांची कामे अद्याप पूर्ण न झाल्याने आरक्षित पाण्याची प्रत्यक्ष उचल सुरू झालेली नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आरक्षित साठा बाजूला ठेवून उरलेले पाणी भातशेतीसाठी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कालव्यांची गळती रोखण्यासाठी ३ कोटी १८ लाख रुपये खर्चून १०४ दुरुस्तीची कामे झाली आणि धरणाच्या जॅकवेलचे कामही पूर्ण झाले; तरीही अडचणीच्या काळात शेतीला पाणी मिळणार नसेल तर सिंचन प्रकल्पाचा उपयोग काय, असा प्रश्न धरणग्रस्त आणि शेतकरी विचारत आहेत.

अतिवृष्टीत दोन्ही कालव्यांचे मोठे नुकसान झाले असून दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांनी सांगितले. कालवे नादुरुस्त आहेत आणि धरणातील पाणी पिण्यासाठी नियोजित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत; मात्र सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी देता येईल का, याची चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माहिती स्रोत: पुढारी

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा