मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

मनोरंजन

सोलापुरात १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘शारदोत्सव २०२६’; पाच दिवस संगीत, कविता आणि इतिहासावर कार्यक्रम

सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम; हुतात्मा स्मृती मंदिरात डॉ. मृदुला दाढे यांच्या कार्यक्रमाने सुरुवात

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, सोलापूर

प्रकाशित:

सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर
प्रतीकात्मक छायाचित्र: सोलापूर छायाचित्र: Dhondudagde / विकिमीडिया कॉमन्स, CC0

सोलापूर : सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाचा ‘शारदोत्सव २०२६’ १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान पार्क चौकातील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे. व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या या महोत्सवात संगीत, कविता, गप्पा, विनोद, इतिहास आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनावरील चिंतन अशी मेजवानी सोलापूरकरांना मिळणार आहे.

पाच दिवसांत पाच वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर रसिकांशी संवाद साधतील. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, कवी वैभव जोशी, प्रा. डॉ. दीपक पवार, प्रा. दीपक देशपांडे आणि गायिका व संगीत अभ्यासक डॉ. मृदुला दाढे यांचे कार्यक्रम होणार आहेत.

सोमवारी (१२ ऑक्टोबर) डॉ. मृदुला दाढे यांच्या ‘सुरांच्या पाऊलखुणा’ या कार्यक्रमाने उत्सवाची सुरुवात होईल. हिंदी चित्रपटसंगीताच्या प्रवासावर आधारित या कार्यक्रमात संगीतकारांच्या शैली, गीतकारांची शब्दकळा, गाण्यांच्या निर्मितीमागील किस्से आणि काळानुसार बदललेले चित्रपटसंगीत यांचा वेध घेतला जाईल. नीलेश निरगुडकरही त्यात सहभागी होतील.

सिद्धेश्वर बँकेचे संस्थापक सहकारमहर्षी दिवंगत वि. गु. शिवदारे यांच्या पुढाकाराने ही व्याख्यानमाला सुरू झाली आणि राजशेखर शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ती सुरू राहिली. गेल्या चार दशकांत देशभरातील अनेक साहित्यिक आणि विचारवंतांनी या व्यासपीठावरून सोलापूरकरांशी संवाद साधला आहे.

माहिती स्रोत: हिंदुस्थान समाचार

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा