मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

गायरानधारकांना सातबारा द्या, दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार द्या; हिंगोलीत रिपब्लिकन सेनेचे आसूड आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, हिंगोली

प्रकाशित:

मोकळ्या जमिनीवर चरणारी जनावरे
प्रतीकात्मक छायाचित्र: गायरान छायाचित्र: Bharath Raja from India / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 2.0

हिंगोली : गायरान जमिनी नियमानुकूल करून त्या कसणाऱ्यांच्या नावे सातबारा उतारे द्यावेत आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेने शुक्रवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आसूड आंदोलन केले. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष किरण घोंगडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणला.

त्यानंतर आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्याकडे निवेदन सोपवले. गायरान जमिनी नियमानुकूल कराव्यात, सातबाऱ्यावरील ‘पोटखराब’ नोंदी वगळाव्यात, पात्र लाभार्थ्यांना शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) द्यावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशा मागण्या त्यात आहेत. संबंधित सर्व प्रस्ताव उपविभागीय स्तरावर दाखल करून घेण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे आंदोलकांना सांगण्यात आले.

वडहिवरा, बोरगाव, चौंडी, साळवा, तरोडा, डोंगरगाव, माळवटा, मुरुंबा, टेंभुर्णी, बेलथर, वाकोडी, असोला, पळसगाव आणि मरसुळ या गावांतील शेकडो गायरानधारक आंदोलनात सहभागी झाले. गायरानधारकांना जमिनीचा हक्क आणि शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

माहिती स्रोत: पुढारी

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा