मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

फायबर केबलच्या कामात जलवाहिनी फुटली; मानवत शहराचा पाणीपुरवठा सहा दिवसांपासून विस्कळित

नवरात्र तोंडावर असताना पाणीटंचाई; दोन दिवसांत सर्व भागांत पाणी पोहोचवण्याचा पालिकेचा प्रयत्न

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, परभणी

प्रकाशित:

पाणीपुरवठ्याची जलवाहिनी
प्रतीकात्मक छायाचित्र: iMahesh / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

मानवत : शहरात एका दूरसंचार कंपनीसाठी फायबर केबल टाकली जात असताना पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे पाच-सहा पाइप फुटले. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. नवरात्रोत्सवाची तयारी सुरू असतानाच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

रविवारी (ता. ४) रात्री केबल टाकताना जेसीबीचा धक्का लागून मुख्य जलवाहिनीचे मोठे नुकसान झाले. सुरुवातीला एकाच ठिकाणी गळती दिसली होती; मात्र दुरुस्ती हाती घेतल्यावर आणखी काही ठिकाणी पाइप फुटल्याचे लक्षात आले आणि काम गुंतागुंतीचे बनले. मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंते, तंत्रज्ञ आणि कामगारांचे पथक चार दिवसांपासून रात्रंदिवस गळती शोधून नवे पाइप बसवत आहे. तांत्रिक अडचणींमुळे अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे.

संबंधित कंपनीने रीतसर परवानगी घेऊनच काम सुरू केले होते; मात्र त्यादरम्यान जलवाहिनीचे मोठे नुकसान झाल्याने पाणीपुरवठा बाधित झाला. तो लवकरच सुरळीत होईल, असे मुख्याधिकारी सावरे यांनी सांगितले. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन येत्या दोन दिवसांत सर्व भागांत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी सांगितले.

माहिती स्रोत: सकाळ

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा