मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

देवपूरमधील वाचनालयाची इमारत पाडल्याच्या निषेधार्थ धुळ्यात आंदोलनाचा इशारा

परवानगीविना कारवाई केल्याचा संस्थेचा आरोप; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि १५ लाखांची भरपाई देण्याची मागणी

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, धुळे

प्रकाशित:

सार्वजनिक वाचनालयाचे अभ्यासदालन
प्रतीकात्मक छायाचित्र: सार्वजनिक वाचनालय छायाचित्र: Samircreator / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

धुळे : शहरातील देवपूर भागात अंडाकृती गार्डनजवळ गेली २५ ते ३० वर्षे चालणाऱ्या क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासनमान्य सार्वजनिक वाचनालय आणि अभ्यासिकेची इमारत महापालिका प्रशासनाने कोणतीही परवानगी न घेता पाडल्याचा आरोप संस्थेने केला आहे. या कारवाईमुळे आंबेडकरी अनुयायी आणि सामाजिक संघटनांमध्ये संताप असून तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष गोविंद कांबळे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

हे ग्रंथालय शासकीय निधीतून उभारले होते, असे कांबळे यांचे म्हणणे आहे. वाचनालयाचा प्रस्ताव महापालिकेकडे प्रलंबित असताना आणि न्यायालयाचा निकाल वाचनालयाच्या बाजूने लागलेला असतानाही प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही, असा आरोप त्यांनी केला. ३ एप्रिल २०२५ रोजी न्यायालयाने महापालिकेला तीन लाखांचा दंड आणि पर्यायी जागा देण्याचे आदेश दिले होते, असेही त्यांनी नमूद केले.

अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करत राजकीय दबावाखाली ही कारवाई केल्याचा आरोप संस्थेने केला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून १५ लाख रुपयांची भरपाई वसूल करावी आणि ती रक्कम वाचनालयाला द्यावी, अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे. महापालिकेची बाजू समजू शकली नाही.

माहिती स्रोत: सकाळ

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा