मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

आरोग्य

सांगली जिल्ह्यातील ४८ मुलांवर होणार मोफत हृदयशस्त्रक्रिया

सेवा संकल्प अभियानात सिव्हिल रुग्णालयात २०८ मुलांची टूडी इको तपासणी; ३५ जणांवर औषधोपचार सुरू

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, सांगली

प्रकाशित:

मानवी हृदयाचे शरीररचनाशास्त्रीय प्रतिरूप
प्रतीकात्मक छायाचित्र: हृदयाचे प्रतिरूप छायाचित्र: Dguendel / विकिमीडिया कॉमन्स, CC BY 4.0

सांगली : राज्यभर सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून मुलांसाठी मोफत ‘टूडी इको’ तपासणी शिबिर घेण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात जिल्ह्यातील २०८ मुलांच्या हृदयाची तपासणी झाली. त्यापैकी ४८ मुलांवर मुंबईतील रुग्णालयात मोफत हृदयशस्त्रक्रिया केली जाणार आहे.

शाळा आणि अंगणवाड्यांतील आरोग्य तपासणीत संशयित आढळलेल्या ० ते १८ वयोगटातील मुलांना या शिबिरासाठी पाठवण्यात आले होते. मुंबईच्या बालाजी हॉस्पिटलमधील बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री मिश्रा यांनी तपासणी केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आणि जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली.

तपासणीनंतर ४८ मुलांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे स्पष्ट झाले. ३५ मुलांवर औषधोपचार सुरू करण्यात आले असून ४० मुलांना सहा महिन्यांनंतर पुन्हा तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या मुलांना प्रवास, निवास आणि भोजनाच्या मोफत व्यवस्थेसह मुंबईला पाठवण्याची प्रक्रिया लगेच सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या समन्वयाने हे शिबिर झाले. डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व मंजूर शाळांमधील आरोग्य तपासणी आणि १०० टक्के संदर्भसेवा पूर्ण करण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन आहे.

माहिती स्रोत: पुढारी

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा