राजकारण
सांगली जिल्हा बँकेच्या कथित ८२ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात आजी-माजी संचालकांना क्लीन चिट
निवृत्त न्यायाधीश एम. आर. मखरे यांच्या चौकशीत एकही आरोप सिद्ध नाही; जयंत पाटील यांना दिलासा, पडळकर-खोत यांना धक्का
माय महा राष्ट्र वृत्तसेवा, सांगली
प्रकाशित:

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित ८२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातून सर्व आजी-माजी संचालक आणि तत्कालीन अधिकाऱ्यांना क्लीन चिट मिळाली आहे. चौकशी अधिकारी आणि निवृत्त न्यायाधीश एम. आर. मखरे यांनी चौकशीत एकही आरोप सिद्ध झाला नसल्याचे नमूद करत, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८८ आणि नियम ७२ नुसार हे प्रकरण सबळ पुराव्याअभावी रद्द करून निकाली काढले आहे.
या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह बँकेच्या आजी-माजी संचालकांना दिलासा मिळाला आहे. गेली दोन वर्षे या प्रकरणावरून बँकेवर आरोप करणारे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना हा धक्का मानला जात आहे. बँकेच्या सुरू असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधकांच्या प्रचारातील हा प्रमुख मुद्दा होता.
मागील संचालक मंडळाच्या कारभाराविरोधात शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांनी केलेल्या तक्रारीवरून सहकार विभागाने चौकशी सुरू केली होती. संचालकांच्या अपिलानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी तिला स्थगिती दिली; खोत आणि पडळकर यांनी विधिमंडळात स्थगिती उठवण्याची मागणी केल्यानंतर चौकशी पुन्हा सुरू झाली. सुरुवातीला चार प्रकरणांत सुमारे ५०.५९ कोटींचे नुकसान झाल्याचा ठपका होता; नंतर आणखी सहा प्रकरणे जोडून ही रक्कम सुमारे ८१.९१ कोटींवर गेली.
दहापैकी सात प्रकरणांत, सुमारे ६५ कोटींच्या नुकसानीबाबत, मखरे यांनी आधीच क्लीन चिट दिली होती. संगणक खरेदी, फर्निचर आणि जाहिरात खर्चाच्या उर्वरित तीन प्रकरणांत सुमारे १६.५९ कोटींच्या कथित नुकसानीसाठी आजी-माजी संचालकांसह ५७ जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची सुनावणी पूर्ण करून मखरे यांनी अंतिम निकाल दिला असून त्यातही सर्वांना निर्दोष ठरवले आहे.
माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा
संबंधित बातम्या
- दसरा मेळाव्यांत दुष्काळ केंद्रस्थानी: शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे, नेस्कोवर एकनाथ शिंदे; कोण काय म्हणाले
- धोप येथील शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी पालकमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करा; शिवसेनेचे (ठाकरे) पदाधिकारी आंधळगाव पोलीस ठाण्यात
- गोकुळ पुढील पाच वर्षांत म्हैस दुधाला लिटरमागे २० रुपये वाढ देईल: हसन मुश्रीफ यांचा दावा
- तुळजापूरहून नवरात्रीची ज्योत आणताना अपघात; आटपाडी तालुक्यातील कौठुळीच्या दोघांचा मृत्यू
- दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे घ्या: मुख्यमंत्री; पंचायतराज अभियानात नाशिक जिल्हा परिषद राज्यात प्रथम
- यवतमाळ जिल्हा बँकेसाठी मतदान; उमरखेड, महागाव तालुका गटांत १०० टक्के मतदान
https://mymaharashtra.in/rajkaran/sangli-jilha-bankechya-kathit-82-kotinchya-gairavyavhar-prakranat-aji-maji-10319
