मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा चेहरामोहरा बदलणार; ४०० कोटींचा आराखडा

शाळांसाठी सुमारे ३०० कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचे नियोजन

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, ठाणे

प्रकाशित:

गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
प्रतीकात्मक छायाचित्र: जिल्हा परिषद शाळा छायाचित्र: ABHIJEET / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 3.0

ठाणे : जिल्ह्यातील शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक सक्षम करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने सुमारे ४०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद क्षेत्रांतील शाळांसाठी सुमारे ३०० कोटी, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचे नियोजन यात आहे. या आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आढावा बैठक झाली.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हा आराखडा तयार करण्यात आला आहे. शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची साधने, इंटरनेट जोडणी, सुसज्ज वर्गखोल्या, आदर्श स्वयंपाकगृहे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सक्षम शाळा अभियानांतर्गत गरजेनुसार शाळांची पुनर्बांधणी करून स्मार्ट शाळा उभारल्या जाणार आहेत. शहरांतील अनुभवी शिक्षकांचे सहकार्य घेणे आणि दरवर्षी शाळांचे मूल्यमापन करणे यावरही भर दिला जाणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रे केवळ प्राथमिक तपासणीपुरती मर्यादित न राहता आवश्यक तपासण्या आणि उपचार एकाच ठिकाणी देणारी केंद्रे व्हावीत, असे नियोजन आहे. यासोबत रस्ते, उद्याने आणि तलावांचे सुशोभीकरण, आधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहे, सायकल मार्ग, व्यायामाच्या सुविधा, विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये व अभ्यासिका, तसेच दलित वस्ती आणि झोपडपट्टी भागातील मूलभूत सुविधांच्या कामांवरही भर देण्यात येणार आहे.

माहिती स्रोत: लोकसत्ता

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा