मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

थंडीऐवजी ऑक्टोबर हीट; रत्नागिरीत कमाल तापमान ३७ अंशांवर

किमान तापमानही २५ अंश; दुपारी रस्ते ओस, उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून सावध राहण्याचा सल्ला

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, रत्नागिरी

प्रकाशित:

गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा
प्रतीकात्मक छायाचित्र: गणपतीपुळे किनारा छायाचित्र: Dmpendse / विकिमीडिया कॉमन्स, Public domain

रत्नागिरी : थंडीची चाहूल लागण्याआधीच रत्नागिरीकरांना ऑक्टोबरच्या उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस होते आणि किमान तापमानही २५ अंशांवर राहिले. ऑक्टोबर सुरू होताच उन्हाचा जोर जाणवू लागला असून महिन्याचा पहिला पंधरवडा संपण्याआधीच पारा इतका चढला आहे.

परतीच्या पावसानंतर प्रखर उन्हामुळे हवेतील आर्द्रता आणि उकाडा अचानक वाढला आहे. सकाळपासूनच उष्णता जाणवत असून दुपारच्या कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.

दिवस-रात्रीच्या तापमानातील मोठा फरक आणि वाढती उष्णता यामुळे उष्माघात, डिहायड्रेशन, सर्दी-ताप यांसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणून दुपारी उन्हात फिरणे टाळावे आणि भरपूर पाणी, लिंबूपाणी किंवा ताक प्यावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

माहिती स्रोत: रत्नागिरी खबरदार

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा