मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात आजपासून आदिशक्तीचा जागर; घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ

प्रतापगडची भवानी, औंधची यमाई, मांढरदेवची काळूबाईसह मंदिरांत रोषणाई; घटस्थापनेसाठी सकाळी ६.१९ ते १०.१२ मुहूर्त

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, सातारा

प्रकाशित:

प्रतापगडाची तटबंदी आणि भगवा ध्वज
प्रतीकात्मक छायाचित्र: प्रतापगड, जेथे भवानी मातेचे मंदिर आहे छायाचित्र: सुबोध कुलकर्णी / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

सातारा : ‘आई उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात रविवारी घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. उत्सवानिमित्त सातारा शहरासह जिल्ह्यातील देवींच्या मंदिरांना आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिरे रोषणाईने उजळली आहेत. जिल्ह्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे.

प्रतापगडची भवानी माता, औंधची यमाई देवी, मांढरदेवची काळूबाई, अजिंक्यताऱ्यावरील मंगळाई, किन्हईची साखरगडनिवासिनी, धावडशीची वाघजाई, भुईंजची महालक्ष्मी यांसह अनेक मंदिरांत जागराला प्रारंभ होत आहे. उत्सवकाळात रोज सकाळी महाआरती, पूजा, महानैवेद्य, मंत्रपुष्पांजली, कुंकुमार्चन, भजन, कीर्तन, प्रवचन आणि विविध स्पर्धा होणार आहेत.

घटस्थापनेसाठी रविवारी सकाळी ६ वाजून १९ मिनिटांपासून १० वाजून १२ मिनिटांपर्यंत मुहूर्त असून अभिजित मुहूर्त सकाळी ११.४४ ते १२.३१ असा आहे. नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची पूजा होते. त्यानुसार ११ ऑक्टोबरला केशरी, १२ ला पांढरा, १३ ला लाल, १४ ला निळा, १५ ला पिवळा, १६ ला हिरवा, १७ ला राखाडी, १८ ला जांभळा आणि १९ ऑक्टोबरला मोरपंखी हिरवा असे नवरंग आहेत.

घटस्थापनेच्या तयारीसाठी शनिवारी बाजारपेठांमध्ये नागरिक आणि महिलांची लगबग दिसून आली.

माहिती स्रोत: पुढारी

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा