मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

सांगली महापालिका क्षेत्रात १० टक्के पाणीकपात; रोज १.३ कोटी लिटर कमी उपसा

दसऱ्यानंतर अंमलबजावणीची शक्यता; पहिल्या टप्प्यात कुपवाडमधील पाण्याच्या टाक्या आळीपाळीने बंद

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, सांगली

प्रकाशित:

कसबे डिग्रज येथील कृष्णा नदीचे पात्र
प्रतीकात्मक छायाचित्र: सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी छायाचित्र: सुबोध कुलकर्णी / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

सांगली : पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीची झळ आता सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रालाही बसणार आहे. शासनाच्या आदेशानुसार शहरात दहा टक्के पाणीकपात होणार असून त्यामुळे रोजचा पाणीउपसा सुमारे १ कोटी ३० लाख लिटरने (१३ एमएलडी) कमी होईल. प्रशासनाचे नियोजन सुरू असून ही कपात दसऱ्यानंतर लागू होण्याची शक्यता आहे.

तिन्ही शहरांसाठी सध्या रोज सुमारे १३० एमएलडी पाणी उचलले जाते. सांगली आणि कुपवाडला सांगलीतील कृष्णा नदीवरील जॅकवेलमधून, तर मिरजेला मिरज येथे कृष्णेतूनच पाणी घेतले जाते. यातील दहा टक्के उपसा थांबवण्याचे आदेश शासनाकडून आले आहेत.

पहिल्या टप्प्यात कुपवाडमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आळीपाळीने रिकाम्या ठेवल्या जाणार आहेत. कुपवाडच्या प्रभाग २, ८, ९ आणि १९ यांना महापालिकेच्या १२ टाक्यांमधून पाणी मिळते. वेळापत्रकानुसार गव्हर्नमेंट कॉलनी (सोमवार), कापसे प्लॉट (मंगळवार), शालिनीनगर (बुधवार), शामनगरची जुनी टाकी (गुरुवार), शामनगरची नवी टाकी (शुक्रवार), गव्हर्नमेंट कॉलनीची जुनी टाकी (शनिवार) आणि कुपवाड गावठाणातील टाकी (रविवार) त्या त्या दिवशी भरली जाणार नाही, त्यामुळे त्या भागाचा पाणीपुरवठा त्या दिवशी बंद राहील. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत संबंधित प्रभागांच्या नगरसेवकांना पत्र दिले आहे.

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस घटला असून खरीप हंगामातील पहिला निकष (ट्रिगर) लागू झालेल्या २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. धरणे, तलाव आणि इतर जलस्रोतांतील पाणी काटकसरीने वापरून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी पुरेल, असे धरणनिहाय नियोजन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

माहिती स्रोत: सामना

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा