महाराष्ट्र
परभणीत नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ; मंदिरांत घटस्थापना, सायंकाळी मंडळांकडून देवीची प्रतिष्ठापना
श्री अष्टभुजा देवी मंदिरात नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम; शतचंडी हवन यंदाचे विशेष आकर्षण
माय महा राष्ट्र वृत्तसेवा, परभणी
प्रकाशित:

परभणी : शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी (ता. ११) शहरात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. वसमत रस्त्यावरील श्री कालिका देवी, शनिवार बाजारातील श्री दुर्गादेवी, कोमटी गल्लीतील श्री रेणुका माता आणि गांधी पार्क परिसरातील श्री अष्टभुजा देवी मंदिरासह शहरातील देवी मंदिरांत सकाळपासून घटस्थापनेची लगबग होती. पहाटे साडेसहापासून मुहूर्त असल्याने अनेकांनी सकाळीच घटस्थापना केली. दुपारी साडेबारापर्यंत विधी सुरू होते, तर काही ठिकाणी सायंकाळी गोरज मुहूर्तावर घटस्थापना झाली.
सायंकाळच्या मुहूर्तावर शहरातील सार्वजनिक दुर्गा मंडळांत देवीच्या मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या. काही मंडळांनी वाजतगाजत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्याने शहरातील प्रमुख रस्ते देवीच्या जयघोषाने दुमदुमले. त्याआधी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी बाजारातून देवीच्या मूर्ती खरेदी केल्या.
श्री अष्टभुजा देवी मंदिरात विधिवत घटस्थापना झाली. नऊ दिवसांच्या उत्सवात रोज पहाटे पाचला पूजा, सकाळी सातला आरती, सकाळी नऊ ते दुपारी बारा सप्तशती पाठ व हवन आणि दुपारी दोन ते सायंकाळी पाच हवन व आरती होणार आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था असून शतचंडी हवन हे यंदाचे विशेष आकर्षण आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीचे दर्शन घेतले.
माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा
संबंधित बातम्या
- दिवाळी २०२६: वसुबारस ५ नोव्हेंबरला, लक्ष्मीपूजन ८ला आणि भाऊबीज ११ नोव्हेंबरला; संपूर्ण दिनदर्शिका आणि मुहूर्त
- दसऱ्याला हवामान कसे? मुंबईत निरभ्र आकाश आणि ३६ अंश; कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाच्या सरींची शक्यता
- दसरा २०२६: तुमच्या शहरात विजय मुहूर्त किती वाजता? ७ शहरांच्या वेळा आणि खास मराठी शुभेच्छा
- नवरात्रोत्सवासाठी अमरावतीत दोन हजारांहून अधिक पोलीस; जिल्ह्यात २,५८३ मंडळांत देवीची स्थापना
- अभिजीत दिपके आजींच्या अंत्यसंस्काराला मुकले; दिल्ली पोलिसांनी वेळेत सोडले नाही, आई-वडिलांचा आरोप
- ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात तुळजापुरात घटस्थापना; तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाला प्रारंभ
https://mymaharashtra.in/maharashtra/parbhanit-navratrotsavala-bhaktimay-vatavranat-prarambh-mandirant-ghatasthapna-10314
