मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा ११ ऑक्टोबरला रद्द; प्रवाशांची ऐनवेळी धावपळ

‘परिचालन कारणां’मुळे उड्डाणे रद्द केल्याची माहिती; आठवड्यातून पाच दिवस सेवेची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, अमरावती

प्रकाशित:

आकाशात उडणारे प्रवासी विमान
प्रतीकात्मक छायाचित्र: A S M Jobaer / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

अमरावती : अलायन्स एअरची ११ ऑक्टोबरची मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा परिचालन कारणांमुळे (ऑपरेशनल रिझन्स) रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी समाज माध्यमांद्वारे ही माहिती दिली.

या दिवसाची तिकिटे काढलेल्या प्रवाशांना उड्डाणे रद्द झाल्याचा संदेश मिळाल्याने ऐनवेळी पर्यायी व्यवस्था करावी लागली. रेल्वेचे तिकीट ऐनवेळी मिळणे शक्य नसल्याने अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरला नाही. यापूर्वीही ही विमानसेवा अनेकदा रद्द झाली आहे.

४ ऑक्टोबरपासून आठवड्यातून पाच दिवस सेवा देण्याचा निर्णय अलायन्स एअरने घेतला होता आणि त्यासाठी ऑनलाइन आरक्षणही सुरू झाले होते; मात्र प्रत्यक्षात रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून चारच दिवस उड्डाणे होत आहेत. गेल्या वर्षी १ ते १५ डिसेंबरदरम्यान दाट धुक्यामुळे ही सेवा बंद ठेवण्यात आली होती.

माहिती स्रोत: हिंदुस्थान समाचार

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा