मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

ज्येष्ठ मालवणी कवी दिगंबर गावकर यांचे निधन; ‘गाऱ्हाणा’कार हरपला

देवगडमधील गिर्येचे सुपुत्र; गाबीत समाजाच्या जीवनाला आणि मालवणी बोलीला साहित्यात स्थान देणारे कवी

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, सिंधुदुर्ग

प्रकाशित:

समुद्रकिनारी असलेला देवगड किल्ला
प्रतीकात्मक छायाचित्र: देवगड किल्ला छायाचित्र: Mvkulkarni23 / विकिमीडिया कॉमन्स, CC BY 3.0

देवगड : मालवणी बोलीभाषा आणि कोकणच्या लोकसंस्कृतीला आपल्या कवितेतून जिवंत ठेवणारे ज्येष्ठ कवी दिगंबर गणू गावकर यांचे मुंबईत निधन झाले. ते देवगड तालुक्यातील गिर्ये गावचे सुपुत्र होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कोकणातील साहित्य आणि सांस्कृतिक वर्तुळात शोक व्यक्त होत आहे.

कोकणचा निसर्ग, तेथील माणसे आणि विशेषतः समुद्राशी नाते असलेल्या गाबीत समाजाचा संघर्ष व संस्कृती हा गावकर यांच्या लेखनाचा गाभा होता. या समाजाची सुखदुःखे, बोलीतील गोडवा आणि कोकणातील पारंपरिक रीतिरिवाज त्यांनी जवळून अनुभवले आणि तेच अनुभव कवितेत उतरवले.

त्यांनी मालवणी बोलीत विपुल लेखन केले. त्यांचा ‘गाऱ्हाणा’ हा मालवणी काव्यसंग्रह विशेष गाजला. कोकणात देवाचरणी घातल्या जाणाऱ्या पारंपरिक गाऱ्हाण्याला त्यांनी वाङ्मयीन दर्जा मिळवून दिला. मालवणी भाषेचा अस्सल ठसका, संवादाची सहजता आणि उपरोधिक विनोद ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती.

त्यांच्या निधनाने मालवणी भाषेची मोठी हानी झाली असून एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत स्थानिक साहित्यिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

माहिती स्रोत: पुढारी

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा