मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

कर्णपुरा यात्रेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त; एसआरपीएफची तुकडी तैनात, पंचवटी चौक परिसरातील मार्ग बंद

नवरात्रोत्सवात गर्दी नियंत्रण आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी छावणी विभागाचे नियोजन; प्रत्येक ठाण्यातील एक कर्मचारी साध्या वेशात

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, छत्रपती संभाजीनगर

प्रकाशित:

महाराष्ट्रातील एक देवी मंदिर
प्रतीकात्मक छायाचित्र: देवीचे मंदिर छायाचित्र: Amitabha Gupta / विकिमीडिया कॉमन्स, CC BY 4.0

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रात कर्णपुरा देवीच्या दर्शनाला जिल्ह्यातून आणि मराठवाड्यातून मोठी गर्दी होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांच्या छावणी विभागाने यात्रेच्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील २५० पुरुष आणि ७५ महिला अंमलदारांसह राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) एक प्लाटून तैनात करण्यात येत आहे.

बंदोबस्ताची संपूर्ण देखरेख परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडे असून सहायक पोलीस आयुक्त मजहर सय्यद प्रभारी, तर सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव सहप्रभारी अधिकारी आहेत. सिटी चौक, क्रांती चौक, बेगमपुरा, छावणी, सिडको, वाळूज, दौलताबाद, जिन्सी, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, उस्मानपुरा, सातारा यांसह अनेक ठाण्यांतील अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तात असतील.

पोलीस मुख्यालयातून आणखी ३५ पुरुष आणि २४ महिला अंमलदार देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्ष आणि गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी सोपवण्यात आली असून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील एक कर्मचारी साध्या वेशात गर्दीवर लक्ष ठेवेल.

नवरात्रोत्सवाच्या काळात भगवान महावीर चौक ते पंचवटी चौक या उड्डाणपुलाखालचा येण्या-जाण्याचा मार्ग आणि रेल्वे स्टेशनकडून पुलाखालून पंचवटी चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. लोखंडी पूल ते पंचवटी चौक आणि कोकणवाडी चौक ते पंचवटी चौक हे मार्गही दोन्ही दिशांनी बंद असतील.

माहिती स्रोत: सकाळ

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा