मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

दुष्काळामुळे लातूरच्या जय अंबिका मंदिराचे नवरात्रातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द; १.११ लाख रुपये दुष्काळनिधीला

रविवारपासून शारदीय नवरात्रोत्सव; शहरातील मंदिरांत आणि बाजारपेठेत घटस्थापनेची लगबग

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, लातूर

प्रकाशित:

नवरात्रोत्सवातील देवीची मूर्ती
प्रतीकात्मक छायाचित्र: नवरात्रोत्सव छायाचित्र: आर्या जोशी / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0 (काटछाट केलेले)

लातूर : आश्विन शुद्ध प्रतिपदेला, म्हणजे रविवारी (ता. ११) शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून शहरातील देवीच्या मंदिरांत आणि सार्वजनिक मंडळांत तयारीची लगबग सुरू आहे. यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याने काही देवस्थानांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

गांधी मार्केट भागातील जय अंबिका मंदिरात दरवर्षी नवरात्रात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट लक्षात घेऊन यंदा सांस्कृतिक कार्यक्रम न घेण्याचे देवस्थानने ठरवले आहे. त्यासाठी लागणारी १ लाख ११ हजार १११ रुपयांची रक्कम दुष्काळनिधी म्हणून राज्य सरकारकडे दिली जाणार असून ती स्वीकारण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना निमंत्रण देण्यात आले आहे, असे देवस्थानचे अध्यक्ष अमर कोकाटे यांनी सांगितले. या मंदिरात रविवारी सकाळी ११.३३ वाजता उद्योजक प्रवीण ब्रिजवासी यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.

गंजगोलाईतील श्री जय जगदंबा मंदिरात रविवारी दुपारी पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सवमूर्तीची मिरवणूक निघेल आणि गंजगोलाईला पाच प्रदक्षिणा घातल्या जातील. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर बिडवे यांच्या हस्ते घटस्थापना होईल. जुना औसा रस्ता भागातील श्री कालिका देवी मंदिरात सकाळी पंचामृत अभिषेकानंतर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दीपक दीक्षित यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.

मंदिरांची रंगरंगोटी, फुलांची आणि दिव्यांची सजावट, मंडप आणि मंदिरांच्या प्रतिकृती उभारण्याची कामे सध्या जोरात सुरू आहेत. बाजारपेठेतही फळे, बांगड्या, पूजेचे वस्त्र, परडी आणि काळी माती खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली आहे.

माहिती स्रोत: सकाळ

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा