मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

नवरात्रातील निर्माल्य पाण्यात नको; अकोल्यात २२ ऑक्टोबरपासून ‘निर्माल्य कलश रथ’

१६ वर्षांपासूनचा उपक्रम यंदाही; शहराच्या विविध भागांत फिरणाऱ्या रथात निर्माल्य देण्याचे आवाहन

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, अकोला

प्रकाशित:

झेंडूच्या फुलांचे हार
प्रतीकात्मक छायाचित्र: SnapMeUp / विकिमीडिया कॉमन्स, CC BY 4.0

अकोला : नवरात्रोत्सवात देवीच्या चरणी अर्पण केलेले हार, फुले, दूर्वा, बेलपत्र आणि इतर निर्माल्य नद्या, नाले आणि जलस्रोतांत न टाकता त्याचे योग्य संकलन आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन व्हावे, यासाठी शहरात गेल्या १६ वर्षांपासून ‘निर्माल्य कलश रथ’ उपक्रम राबवला जात आहे. यंदा हा रथ गुरुवारी, २२ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजल्यापासून शहराच्या विविध भागांत फिरणार आहे.

नागरिकांनी घरातील निर्माल्य या रथातच द्यावे, असे आवाहन गटनेते आणि नगरसेवक नीलेश देव यांनी केले आहे. उत्सवात देवीला अर्पण केलेल्या फुलांचे आणि निर्माल्याचे विसर्जन अनेकदा पाण्यात केले जाते, त्यामुळे जलप्रदूषण होण्याची शक्यता असते.

श्रद्धा जपतानाच निसर्गाचे रक्षणही व्हावे, या विचारातून नीलेश देव यांच्या पुढाकाराने ही परंपरा १६ वर्षांपासून सुरू आहे. २२ ऑक्टोबरला सकाळी अशोक वाटिका येथून संकलन मोहिमेला सुरुवात होईल आणि रात्री आठपर्यंत रथ शहरातील वस्त्या, अपार्टमेंट आणि सोसायट्यांमध्ये ठरलेल्या वेळेनुसार पोहोचेल. निर्माल्य रस्त्यावर, नाल्यात किंवा पाण्यात टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

माहिती स्रोत: हिंदुस्थान समाचार

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा