मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

गुन्हे

अकोल्यात अवैध सावकारीविरोधात २८ ठिकाणी एकाच वेळी छापे; २२६ जणांच्या पथकांची कारवाई

चार जिल्ह्यांतील सहकार अधिकाऱ्यांसह पोलिसांचा सहभाग; ११ तक्रारींवरून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, अकोला

प्रकाशित:

जुना मुद्रांक कागद
प्रतीकात्मक छायाचित्र: British Government / विकिमीडिया कॉमन्स, Public domain

अकोला : अवैध खासगी सावकारीविरोधात सहकार विभागाने शुक्रवारी (ता. ९) शहरात विविध ठिकाणी छापे टाकले. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तब्बल २२६ जणांच्या पथकांनी २८ ठिकाणी झडती घेऊन आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली, अशी माहिती सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांनी दिली. विभागाची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात अवैध सावकारीबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. ११ तक्रारदारांच्या तक्रारींवरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ नुसार हे छापे टाकण्यात आले. अकोला, अमरावती, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यांतील प्रशासन व लेखापरीक्षण विभागाचे १२० अधिकारी-कर्मचारी, ४० पंच, पोलीस दलाचे २२ अधिकारी आणि ४४ महिला व पुरुष कर्मचारी असे २२६ जण संयुक्त पथकांत होते.

झडतीत इसार पावत्या, धनादेश यांसह विविध कागदपत्रे हाती लागली असून त्यांची तपासणी करून पुढील कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

माहिती स्रोत: लोकसत्ता; एबीपी माझा

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा