मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

गुन्हे

शेअर बाजारात नफ्याचे आमिष; साताऱ्यात ज्येष्ठ नागरिकाची १.७१ कोटींची फसवणूक

व्हॉट्सॲपवरून संपर्क, बनावट गुंतवणूक कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा बनाव; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, सातारा

प्रकाशित:

मोबाईलवरील ट्रेडिंग ॲप्स
प्रतीकात्मक छायाचित्र: ऑनलाइन ट्रेडिंग छायाचित्र: forextime.com / विकिमीडिया कॉमन्स, CC BY 2.0

सातारा : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरघोस नफ्याचे आमिष दाखवून शहरातील एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १.७१ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर २०२६ या काळात हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, एका महिलेने व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून आपण एका गुंतवणूक कंपनीची प्रतिनिधी असल्याचे भासवले. एका प्लॅटफॉर्मद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून तिने तक्रारदाराला गुंतवणुकीस प्रवृत्त केले. सुरुवातीला नफा होत असल्याचे दाखवून विश्वास संपादन करण्यात आला आणि त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांवर पैसे भरायला सांगितले गेले.

तक्रारदाराने एकूण १ कोटी ७१ लाखांहून अधिक रक्कम गुंतवली. मात्र अपेक्षित परतावा न मिळाल्याने त्यांनी रकमेची मागणी केली असता ती देण्यास नकार मिळाला आणि फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलीस निरीक्षक डी. पी. देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

माहिती स्रोत: नवराष्ट्र

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा