मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

अर्थकारण

वारंवार खंडित वीजपुरवठ्याने मार्केट यार्डातील गूळ-भुसार व्यापार अडचणीत

इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, संगणकीय बिलिंग आणि जीएसटीचे काम ठप्प; चेंबरचे महावितरण व बाजार समितीला पत्र

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, पुणे

प्रकाशित:

पुण्यातील एका बाजारात खरेदी करणारे नागरिक
प्रतीकात्मक छायाचित्र: पुण्यातील बाजार छायाचित्र: Siddheshnampurkar / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 3.0

पुणे : सणासुदीमुळे मार्केट यार्डात खरेदी-विक्रीची लगबग वाढली असताना गूळ-भुसार विभागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वीज वारंवार जात असून कमी-जास्त दाबाने पुरवठा होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, संगणकीय बिलिंग आणि जीएसटीशी संबंधित कामे अडकत आहेत.

या विभागात रोज शेतमालाची मोठी आवक-जावक आणि आर्थिक उलाढाल होते आणि बहुतांश व्यवहार संगणक व इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर चालतात. वीज गेल्यावर मालाचे वजन, बिलिंग आणि मालाची ने-आण थांबते. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहक, पुरवठादार आणि वाहतूकदारांचाही खोळंबा होतो आणि व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे व्यापारी सांगतात.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करावा, यासाठी चेंबरच्या वतीने महावितरण आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देण्यात आले आहे. गूळ-भुसार विभागाला अखंडित आणि योग्य दाबाने वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सणासुदीत व्यवहारांना वेग आलेला असतानाच वीज जात असल्याने वजनकाटे बंद पडतात आणि दैनंदिन व्यवहार अडतात, अशी व्यथा दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुगळे यांनी मांडली.

माहिती स्रोत: पुढारी

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा